Monday, April 30, 2012

महाराष्ट्र दिन

महाराष्ट्राच्या शूरवीरांची साक्ष देती हे सह्यकडे ।
स्फूर्ती घेऊनि त्यांच्यापासुनी राष्ट्र रक्षिण्या होऊ खडे ।। धृ.।।

तलवारीच्या तालावरती शूर नाचले थयाथया 
थयाथयाट तो पाहुनी करतो शत्रू त्यापुढे गयावया ।
आठवुनी त्या पराक्रमाला पाऊल टाकू सदा पुढे 
स्फूर्ती घेऊनि त्यांच्यापासुनी राष्ट्र रक्षिण्या होऊ खडे ।। १ ।।

गोब्राह्मण प्रतिपालक राजा इथेच झाला तो शिवबा 
महाराष्ट्राच्या जरिपटक्याला अटकपार ने राघोबा ।
राक्षसभुवनी माधवरावे निजामास चारिले खडे  
स्फूर्ती घेऊनि त्यांच्यापासुनी राष्ट्र रक्षिण्या होऊ खडे ।। २।।

त्या रक्ताचे वारस आम्ही भाग्य असे हो हे अमुचे 
हुंकाराने केवळ अमुच्या ऊर धडाडे शत्रूचे ।
राष्ट्रघातकी शोधून त्यांना चला देऊया उचित धडे 
स्फूर्ती घेऊनि त्यांच्यापासुनी राष्ट्र रक्षिण्या होऊ खडे ।। ३।।

Monday, April 23, 2012

'अग्नी-५'च्या निमित्ताने

आपले माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांनी "भारत २०२०" हे स्वप्न पाहिलं. आपला देश महासत्ता होईल असा विश्वास आपल्या देशबांधवांना दिला. साऱ्या जगाच्या नजरा भारताकडे लागल्या. हे सारे खरे आहे. पण खरंच हे घडेल का? 

अशी शंका का यावी? आणि तीही 'अग्नी-५' चे यश हाती असताना! आश्चर्य वाटतंय नं? वाटो. मला मात्र वेदना जाणवतात. का? काय महत्त्व 'अग्नी-५'ला दिलं आम्ही?  'अग्नी-५'चं यश पाहून किती लोकांनी आनंदोत्सव साजरा केला? किती फटाके वाजले? ज्या घटनेनं आमच्या शेजारच्याच काय पण जगातल्या अन्य मोठ्या राष्ट्रांचे एका अर्थानं धाबे दणाणले त्या घटनेचं स्वागत आम्ही कसं केलं? या साऱ्या प्रश्नांचं मोहोळ मनात उठतं. 

आज देशातील तरुणच काय तर त्यांचे आजोबाही क्रिकेटज्वरानं ग्रासले आहेत. भारताचा सामना सुरु असेल तर साऱ्यांचे लक्ष त्याकडेच. पाकिस्तानशी सामना असेल तर रस्ते संचारबंदीची आठवण करून देतात. सामना जिंकला तर फटाक्यांचे आवाज तोफांची आठवण करून देतात. अगदी रात्री - अपरात्रीही. आणि हे सारं अगदी स्वेच्छेने. ना आदेश ना फतवा. मतभेद, पंथभेद, पक्षभेद, आर्थिक - सामाजिक - शैक्षणिक अंतर कशाकशाचा भेद नसतो. गल्ली ते दिल्ली फक्त हा आणि हाच विषय. त्याखालोखाल चर्चा असते चित्रपटक्षेत्राची. परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेतील 'उताऱ्याला योग्य शीर्षक' द्यायला ज्यांना जमलं नाही अशी मंडळीही अभिनेत्यांच्या घरातील बारशाची, नाव काय ठेवायचं याची चर्चा करताना दिसतात. या पार्श्वभूमीवर ' अग्नी-५' ची दखल आम्ही कशी घेतली? त्या संशोधकांचं अभिनंदन करण्यासाठी, हा आनंद share करण्यासाठी किती एसएम्एस पाठवले गेले?                   
ज्या घटनेचा आपल्या देशाच्या म्हणजेच पर्यायानं आमच्या व्यक्तिगत सुरक्षेशी संबंध आहे त्या घटनेबद्दल आमची प्रतिक्रिया काय ? 

माझं ना क्रिकेटशी वैर ना चित्रपटाशी. पण शालेय जीवनातल्या १९६५ व १९७१ च्या युद्धांच्या आठवणी आजही मनात ताज्या आहेत. चर्चा, सैनिकांना प्रोत्साहन देण्यासाठी सभा, प्रभात फेऱ्या, प्रार्थना कितीतरी उपक्रम. अगदी शालेय विद्यार्थ्यांचा सहभागही महत्त्वपूर्ण असायचा. त्यानंतर विजयाचा जल्लोष, गणेशोत्सवातील त्यासंबंधीचे देखावे. काय काय सांगावं ? या पार्श्वभूमीवर 'अग्नी-५' च्या स्वागताचा उत्साह जाणवला का? नसेल तर का नाही? आमच्या शास्त्रज्ञान्चा उत्साह मग वाढेल कसा? नवे संशोधक निर्माण व्हावेत कसे? क्रिकेटपटू आणि अभिनेते यांच्यासाठी पायघड्या आणि फटाक्यांची आतषबाजी, उद्योजकांपासून शासनापर्यंत  साऱ्यांकडून बक्षिसांची उधळण; पण मग आपल्या  ज्ञानाचा उपयोग राष्ट्रासाठी करणाऱ्या संशोधकांना समाज काय देतो? खेळाडूंना महत्त्व नाही असं नाही पण काही गोष्टींचा तारतम्याने विचार करायची वेळ आली आहे हे नक्की. राष्ट्राचा विकास व्हायचा असेल तर सर्व क्षेत्रांकडे लक्ष हवं हे जितकं खरं तितकंच त्या क्षेत्रांचा प्राधान्यक्रम योग्य रीतीने लावणे आवश्यक आहे हेही महत्त्वाचं. अर्थात हे झाले माझे विचार, साऱ्यांचे तसेच असले पाहिजेत असं नाही.  

Friday, April 13, 2012

माऊली अन् मोगरा

 चैत्र - वैशाख म्हटलं की कैरीचं पन्हं, आंब्याची डाळ,  हरबऱ्याची उसळ या साऱ्या गोष्टी आठवतात. तसाच मोगराही आठवतो. मोगरा म्हणजे वसंत ऋतू. वसंत म्हणजे यौवन, अर्थात शृंगार. पण मग विरागी वृत्तीच्या ज्ञानेश्वरांनी "मोगरा फुलला... " असं का म्हटलं ?   त्यांना मोगरा का आवडला?
फुलांचा राजा गुलाब आहे. सौंदर्य, सुवास, मोहकता हे सारं गुलाबात आहे. आपल्या कांचनवर्णाबरोबरच मोहक सुगंध असणारा सोनचाफा,  स्वर्गाचं वैभव म्हणून ओळखला जाणारा पारिजात, साक्षात लक्ष्मीचं आसन झालेलं कमलपुष्प,  सुकल्यानंतरही सुगंध देत राहणारं बकुळीचं फूल, एवढंच काय,  जाई, जुई, चमेली, सायली, शेवंती अहो कितीतरी नावं आहेत. पण माऊलींनी मात्र  "इवलेसे रोप लावियले द्वारी", म्हणून मोगऱ्यालाच का स्वीकारलं, हा मला पडलेला प्रश्न होता. माऊलींचं चरित्र  लहानपणीच वाचल्यामुळे मलाही मोगऱ्याची ओढ होतीच. म्हणून मीही मोगऱ्याचं  इवलंसं रोप  दारी लावलं. त्याचा वेलू गगनावर नाही पण गच्चीवर गेलाय. आणि त्याची फुलं काढता काढता मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. 
यौवन म्हणजे केवळ शृंगार नव्हे, तर काहीतरी विशेष करून दाखवण्याचा काळ. मानवी जीवनातला सर्वाधिक ऊर्जासंपन्न काळ.  ही ऊर्जा अशी वापरावी की ज्यातून स्वत:ला सुख मिळावेच पण इतरांच्या जीवनातही सुखाची शिंपण करता आली तर अधिक चांगलं; आणि तीही अगदी निरपेक्षपणे, सहजपणे.  असा यौवनाचा अर्थ   माऊलींना अपेक्षित असावा. 
मोगरा बहरतो तो ऐन उन्हाळ्यात. आग ओकणाऱ्या सूर्याच्या साक्षीनं तो बहरतो, मावळत्या दिनकराच्या साक्षीनं तो फुलतो. दिवसभराच्या उष्म्यानं त्रासलेल्या माणसाचा थकवा तो आपल्या शीतल सुगंधानं क्षणार्धात घालवतो. अगदी "मा फलेषु कदाचन" या वृत्तीनं. 
माणूस सुखाच्या शोधात असतो, पण ते त्याला लवकर सापडत नाही. अशावेळी मोगऱ्याशी मैत्री केली तर सुख लवकर हाती येतं. संध्याकाळच्या वेळी आपण मोगऱ्याच्या कळ्या वेलीवरून अगदी शोधून शोधून काढतो. पण दुसऱ्या दिवशी सकाळी पहावं, तर वेलीवर काही फुलं दिसतात. अरेच्च्या, ही कशी काय राहिली? असा प्रश्न आपल्या मनात आल्याशिवाय राहात नाही.  मोगऱ्याच्या कळ्या या पानावर दडलेल्या असतात. आपल्या हाताशी असूनही आपल्याला दिसत नाहीत. दुसऱ्या दिवशी फुलं पाहिल्यावर, अरे इथं तर आपण पाहिलं होतं असं आपण मनात म्हणतो. सुखाचंही अगदी तसंच आहे. ते आपल्या आसपास असतं पण आपल्याला दिसत नाही.  मोगरा आपल्याला सांगतो, नीट पहा, माझ्याइतकंच सुखही तुमच्या जवळ आहे.     
माऊलींना इतर फुलांपेक्षा मोगरा भावला, त्याचं हेही एक कारण असेल. माऊलींनी अनंत यातना सोसल्या. पण ज्ञानेश्वरी, अमृतानुभव यासारखे महान ग्रंथ समाजाच्या हाती घेऊन समाधी घेतली, अगदी ऐन तारुण्यात. जीवनाचं सार्थक झाल्याचं समाधान त्यांना लाभलं. आजच्या तरुणाईनं माऊली आणि मोगरा या दोघांचंही जीवन जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर त्यांनाही जीवनातील इतिकर्तव्यतेचा आनंद अगदी सहजपणे मिळवता येईल यात शंकाच नाही.