Thursday, March 22, 2012

गुढीपाडवा

आम्रफुलांचा सुगंध घेऊनि
लहर वायूची आली ।
सहज आळवी सुरेल पंचम
 कोकिळ प्रातःकाली ।।
तापतापतो जरी हा दिनकर
होय जिवाला त्रास ।
परी मोगरागंध देतसे
जगण्याचा विश्वास ।।
समयाचे हे भान ठेवुनी,
जगा तुम्ही धैर्याने ।
निसर्गराजा सांगत असतो
सदैव अपुल्या कृतिने।
ठेवून याची जाण करूया,
स्वागत नववर्षाचे ।
प्रसन्नता मंत्राने करूया,
सोने आयुष्याचे ।।
 
 हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !
  

Saturday, March 17, 2012

गिरीप्रेमी

शिवसदनासी भगवे तोरण लावण्यास चालला ।
आज शुभेच्छा त्यास्तव देतो वंदुनी गणराया ।।
सह्याद्रीचे पुत्र चालले
शिव आशीष घेण्या
कैलासाचा नाथ आतुरला
शिवभक्ता भेटण्या
हिमालयावर सारे हरहर महादेव बोला ।।
रुद्राचा अवतार शिवाजी
स्वराज्य निर्माता
घेऊनि त्यांचे नाव करावे
वंदन हिमशिखरा
प्रसन्नता शिव सदनी होईल पाहून तुम्हाला ।।
अनुभव तुमचे सारे तिथले
उत्सुक आम्ही ऐकण्या
जीवनातल्या  पराक्रमाला
देतील जे प्रेरणा
शिव शंभूचा प्रसाद ऐसे बोल तुम्ही बोला ।।
वारकरी तुम्ही हिमालयाचे
भाग्यवान हो खरे
आशीष तुमच्या संगे असतील
महाराष्ट्राचे सारे
स्वागत करण्या पायघड्या या घालू हृदयाच्या ।।

गिरीप्रेमीच्या  पुणे एव्हरेस्ट २०१२ मोहिमेस हार्दिक शुभेच्छा !!!

Thursday, March 8, 2012

रंगपंचमी यमुनाकाठी

क्षणापूर्वीची शांत यमुना करिते का खळबळ
अनपेक्षित हा कोठून आला मुक्त हास्यकल्लोळ ।।
हास्यवलय ते छेदित आला कानी मंजुळ स्वर
क्षणात पटली ओळख की हा श्याम मुरलीचा सूर ।।
यमुनेकाठी उभ्या गोपिका बावरल्या क्षणभर
शोध घ्यावया मुरलीधराचा भिरभिरते नजर ।।
तोच अचानक धावत आला गोपसख्यांचा मेळा
राधेसह त्या गवळणी झाल्या कृष्णाभवती गोळा ।।
रंगबिरंगी रंगीत चेहरे पाहून ध्यानी आले
रंगपंचमी खेळत सारे यमुनाकाठी आले ।।
जमल्या साऱ्या गोपगोपिका गोकुळ अवघे आले
हिरवे, पिवळे, लाल, गुलाबी रंग विविध उधळले ।।
गुलाल उधळे कुणी अचानक, कुणी उडवे पिचकारी
धुंद जाहले, रंग खेळता सान थोर नरनारी ।।
गीत गातसे राधा देई साथ त्यास मुरली
रासनृत्य ते करता सारी भान हरपुनी गेली।।
भाग्यवान ती यमुना अवघे गोकुळही ठरले
भाग्याचे त्या वर्णन करता शब्दच मम सरले।।

Tuesday, March 6, 2012

वसंत

वसंत म्हणजे ऋतुंचा  राजा. साहजिकच त्याचे फलांच्या राजाशीही नाते आहेच. आणि म्हणूनच कोकणात वसंताचे दर्शन अधिक विलोभनीय असते. खरं सांगायचं तर कोकण परिसरात या काळात सारी सृष्टी म्हणजेच एक काव्य असतं ! त्या सौंदर्यसागरातील हा एक थेंब नजरेला गवसलेला....

सौंदर्याचे कुंभ बहुत हे
पदोपदी वाटेत सांडले ।
जणू प्रदर्शन विभवाचे हे
परामात्म्याने इथे मांडले ।।

हर्षभरीत हा वायू सांगे
वसंताची चाहुल लागली ।
मनास जुळवित प्रीती धागे
करवंदीची जाळी फुलली ।।

आम्रतरुंना  आला मोहर
सुगंध त्याचा करितो धुंद ।
पंचमात गाउनिया सुस्वर
जपे कोकिळा अपुला छंद ।।

रोमांचित फणसाची कुवरी
हितगुज करिती माडपोफळी ।
बोंडूची या लज्जत न्यारी
अमृतानुभव देती शहाळी ।।