Monday, April 23, 2012

'अग्नी-५'च्या निमित्ताने

आपले माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांनी "भारत २०२०" हे स्वप्न पाहिलं. आपला देश महासत्ता होईल असा विश्वास आपल्या देशबांधवांना दिला. साऱ्या जगाच्या नजरा भारताकडे लागल्या. हे सारे खरे आहे. पण खरंच हे घडेल का? 

अशी शंका का यावी? आणि तीही 'अग्नी-५' चे यश हाती असताना! आश्चर्य वाटतंय नं? वाटो. मला मात्र वेदना जाणवतात. का? काय महत्त्व 'अग्नी-५'ला दिलं आम्ही?  'अग्नी-५'चं यश पाहून किती लोकांनी आनंदोत्सव साजरा केला? किती फटाके वाजले? ज्या घटनेनं आमच्या शेजारच्याच काय पण जगातल्या अन्य मोठ्या राष्ट्रांचे एका अर्थानं धाबे दणाणले त्या घटनेचं स्वागत आम्ही कसं केलं? या साऱ्या प्रश्नांचं मोहोळ मनात उठतं. 

आज देशातील तरुणच काय तर त्यांचे आजोबाही क्रिकेटज्वरानं ग्रासले आहेत. भारताचा सामना सुरु असेल तर साऱ्यांचे लक्ष त्याकडेच. पाकिस्तानशी सामना असेल तर रस्ते संचारबंदीची आठवण करून देतात. सामना जिंकला तर फटाक्यांचे आवाज तोफांची आठवण करून देतात. अगदी रात्री - अपरात्रीही. आणि हे सारं अगदी स्वेच्छेने. ना आदेश ना फतवा. मतभेद, पंथभेद, पक्षभेद, आर्थिक - सामाजिक - शैक्षणिक अंतर कशाकशाचा भेद नसतो. गल्ली ते दिल्ली फक्त हा आणि हाच विषय. त्याखालोखाल चर्चा असते चित्रपटक्षेत्राची. परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेतील 'उताऱ्याला योग्य शीर्षक' द्यायला ज्यांना जमलं नाही अशी मंडळीही अभिनेत्यांच्या घरातील बारशाची, नाव काय ठेवायचं याची चर्चा करताना दिसतात. या पार्श्वभूमीवर ' अग्नी-५' ची दखल आम्ही कशी घेतली? त्या संशोधकांचं अभिनंदन करण्यासाठी, हा आनंद share करण्यासाठी किती एसएम्एस पाठवले गेले?                   
ज्या घटनेचा आपल्या देशाच्या म्हणजेच पर्यायानं आमच्या व्यक्तिगत सुरक्षेशी संबंध आहे त्या घटनेबद्दल आमची प्रतिक्रिया काय ? 

माझं ना क्रिकेटशी वैर ना चित्रपटाशी. पण शालेय जीवनातल्या १९६५ व १९७१ च्या युद्धांच्या आठवणी आजही मनात ताज्या आहेत. चर्चा, सैनिकांना प्रोत्साहन देण्यासाठी सभा, प्रभात फेऱ्या, प्रार्थना कितीतरी उपक्रम. अगदी शालेय विद्यार्थ्यांचा सहभागही महत्त्वपूर्ण असायचा. त्यानंतर विजयाचा जल्लोष, गणेशोत्सवातील त्यासंबंधीचे देखावे. काय काय सांगावं ? या पार्श्वभूमीवर 'अग्नी-५' च्या स्वागताचा उत्साह जाणवला का? नसेल तर का नाही? आमच्या शास्त्रज्ञान्चा उत्साह मग वाढेल कसा? नवे संशोधक निर्माण व्हावेत कसे? क्रिकेटपटू आणि अभिनेते यांच्यासाठी पायघड्या आणि फटाक्यांची आतषबाजी, उद्योजकांपासून शासनापर्यंत  साऱ्यांकडून बक्षिसांची उधळण; पण मग आपल्या  ज्ञानाचा उपयोग राष्ट्रासाठी करणाऱ्या संशोधकांना समाज काय देतो? खेळाडूंना महत्त्व नाही असं नाही पण काही गोष्टींचा तारतम्याने विचार करायची वेळ आली आहे हे नक्की. राष्ट्राचा विकास व्हायचा असेल तर सर्व क्षेत्रांकडे लक्ष हवं हे जितकं खरं तितकंच त्या क्षेत्रांचा प्राधान्यक्रम योग्य रीतीने लावणे आवश्यक आहे हेही महत्त्वाचं. अर्थात हे झाले माझे विचार, साऱ्यांचे तसेच असले पाहिजेत असं नाही.  

No comments:

Post a Comment