Saturday, November 2, 2013

दीपावली

आकांक्षा ही मनी आपुला देश थोर व्हावा ।
आप्तजनांना सतत सुखाचा प्रकाश हा द्यावा ॥
सहजपणाने शिवभावाने जीव हा पुजावा ।
पुसता अश्रू दीनजनांचे आनंद लाभावा ॥
अधर्म, अनीती अज्ञानाचा तिमिर दूर व्हावा ।
संस्काराचा दीप मानसी अखंड तेवावा ॥
देशासाठी देह आमुचा चंदन हा व्हावा ।
सत्कार्यातुनी ईशभक्तीचा सुगंध पसरावा ॥
मनामनामधी राष्ट्रभक्तीचा दीप पेटवुया ।
हृदयांतरी हा ध्यास घेऊनी दीपोत्सव करूया ॥

दीपावलीनिमित्त हार्दिक शुभेच्छा!

Thursday, September 5, 2013

संकल्प शिक्षकदिनाचा....

मातृदेवो भव, पितृदेवो भव पाठोपाठ समाजात आचार्य अर्थात शिक्षक श्रेष्ठ. 'आचार्य देवो भव' असं विशेष स्थान शिक्षकांना आहे. गुराख्याचा पोर असणार्‍या चंद्रगुप्ताला आपल्या बुद्धीसामर्थ्याच्या आधारे चाणक्याने चक्रवर्ती सम्राट बनवलं. अलिकडच्या काळात एक शिक्षक या राष्ट्राच्या सर्वोच्च पदावर पोचला होता. पाच सप्टेंबर हा दिवस या शिक्षकाचाच जन्मदिन. हा शिक्षक म्हणजेच आपले भूतपूर्व राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन.
शिक्षक जोपर्यन्त ज्ञानसाधनेशी एकनिष्ठ होते, सत्यमार्गावर चालणारे होते, त्यांची शिकवण आणि त्यांचा आचार यात समानता होती, तोपर्यंत समाजात त्यांना आदर होता. एवढंच काय, पण आपला समाज आणि त्याचबरोबर राष्ट्रही जगात गौरवस्थानी होतं. पण आज...
आजही काही शिक्षक चांगले आहेत. त्यांचं जीवन खर्‍या अर्थानं आदर्श आहे. पण लोकशाही राज्यात बहुसंख्येला महत्त्व असतं. त्यामुळे अशा शिक्षकांच्या ज्ञानाची, त्यागाची प्रशंसा न होता 'शिक्षक' या नावाला न शोभणारी कामे करणारे बहुसंख्य शिक्षक आपल्या अशा बांधवांची चेष्टा करणे, टर उडवणे यात धन्यता मानतात. ज्ञानसाधनेपासून दूर राहणं, गटातटाच्या राजकरणात सहभागी होणं, आपलं अपुरेपण लपवण्यासाठी लाचारी, भाटगिरी असे मार्ग चोखाळणं, हे आज अगदी सहज पाहायला मिळतं. यात काही काळ आनंद मिळत असेल, भौतिक सुखाचा लाभही मिळत असेल; पण हे शाश्वत तर नसतंच, शिवाय स्वतःबरोबर राष्ट्राचं भवितव्यही धोक्यात आणणारं असतं याचं भान यायला हवं.
'हेच  शिकवलं वाटतं शाळेत?' असे सहज उद्गार एखाद्या मुलानं काही गुन्हा केला की आपल्याला ऐकायला मिळतात. याचं कारण कोणत्याही समाजातील सर्वच समस्यांचं मूळ हे शिक्षणात असतं. म्हणून शिक्षणक्षेत्राचं पावित्र्य कायम राखणं, राष्ट्राच्या आणि स्वतःच्या हिताचं आहे, हे शिक्षकांनी विसरू नये.
आज डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्याच विचारांचं चिंतन करायचं तर त्यांचं एक वाक्य आठवतं - 'माणूस आकाशात पक्ष्यांप्रमाणे विहार करायला, माश्याप्रमाणे पाण्यात पोहायलाही शिकला, पण जमिनीवर माणसासारखं चालायला मात्र शिकला नाही.'
जमिनीवर माणसासारखं चालायला शिकवायची जबाबदारी शिक्षकांचीच आहे. ज्ञानाचा वारसा सांगणार्‍या शिक्षकांना यात अशक्य तर काहीच नाही; फक्त त्यांनी मनात आणायला हवं.
तर मग चला, शिक्षकदिनाच्या मुहूर्तावर आपण डॉ. राधाकृष्णन यांची खंत दूर करण्याचा संकल्प करुयात. आदर्श समाजाच्या निर्मितीसाठी, राष्ट्राचा विचार करणारे चंद्रगुप्त निर्माण करण्यासाठी, पर्यायाने आपल्या पूर्वजांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी आपल्या तन - मन - धन शक्तीचा शक्य तेवढा सर्व वापर करण्याचा निश्चय करुयात!

Sunday, November 11, 2012

दीपावली

घराघरातून आळवू सारे चैतन्याचे सूर
चला लावूनि दीप करूया नैराश्याला दूर ।।

संस्कृती अपुली ही अतिप्राचीन
प्रकाशपूजा सांगे प्रतिदिन
पावित्र्याचे हे शुभलक्षण
'सत्य'प्रभावे कृष्ण संपवी इथेच नरकासूर ।।

पाने इथल्या इतिहासाची
पराक्रमाच्या  कथा सांगती
कर्तृत्वाला प्रेरक ठरती
समृद्धीचे वर्णन सांगे तो सोन्याचा धूर।।

विज्ञानाला अध्यात्माची
जोड अचूक ही इथे लाभली
शाश्वत मूल्ये सदैव जपली
या मूल्यांना घेऊन जाऊ आपण जगती दूर।।दीपावलीनिमित्त हार्दिक शुभेच्छा !

Thursday, October 25, 2012

सीमोल्लंघन

शमी ही  श्री गणेशाची लाडकी वनस्पती. अज्ञातवासात पांडवांची शस्त्रे वर्षभर शमी वृक्षावर विसावली होती. याच शस्त्रांनी पुढे अन्याय - अधर्माचा नाश केला. म्हणून शमीचं महत्त्व आणखीनच वाढलं.
निरपेक्षपणे ज्ञानदान करणारे वरतंतू ऋषी, गुरुदक्षिणेचा  आग्रह धरणारा त्यांचा शिष्य कौत्स, कौत्साच्या ज्ञानाचा गौरव करण्यासाठी कुबेराला आव्हान देणारा रघुराजा, रघूच्या पराक्रमाला मान देऊन सुवर्णमोहरांचा  वर्षाव करणारा कुबेर, आपल्याला हव्या तेवढ्याच मोहरा घेणारा कौत्स, शिल्लक मोहरा लुटून टाकणारा दानशूर रघु, या साऱ्यांचा साक्षीदार म्हणजे आपट्याचा वृक्ष. याच वृक्षावर सुवर्णमोहरांचा पाऊस पडला होता.
भारतीय संस्कृतीतील या महान आदर्शांची आठवण म्हणूनच 'शमी' आणि 'आपटा' यांना सोन्याचा मान मिळाला आहे. याच आदर्शांची जपणूक करण्यासाठी आपणही एकत्र येऊयात. 'ज्ञानी', 'दानी' आणि 'स्वाभिमानी' लोकांची परंपरा निर्माण करूयात!
या कार्यासाठी व्यक्तिगत जीवनाच्या सीमा ओलांडून बाहेर पडणे हेच खरे सीमोल्लंघन!

विजयादशमी अर्थात दसरा पर्वाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!


Sunday, May 13, 2012

वाढदिवस

'वाढदिवस', आयुष्यातला एक महत्त्वाचा दिवस. काहींना मोठं झाल्याचा आनंद मिळतो, तर काहीजण नाराज असतात एक वर्ष कमी झालं म्हणून. अर्थात, प्रत्येकाच्या मनावर हा अर्थ अवलंबून असतो. पण माणसाला सुखाची अपेक्षा असेल तर त्यानं नेहमी सकारात्मक विचार करायला हवा. भारतीय संस्कृती ही "तमसो मा ज्योति र्गमय" या पायावर उभी असल्यानं नेहमीच सकारात्मक विचार सांगते. साहजिकच वाढदिवसाला ती दिवाळी इतकाच आनंदाचा दिवस मानते. अभ्यंगस्नान, नवे कपडे, ईश्वराची प्रार्थना करणे, वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घेणे, आईकडून औक्षण करून घेणे, तिने पेढा किंवा तत्सम गोड पदार्थाने तोंड गोड करणे आणि इष्ट-मित्रांच्या शुभेच्छा स्वीकारणे असे सारे सोपस्कार भारतीय वाढदिवसात आहेत. या साऱ्यातून मिळणारा आनंद अविस्मरणीय असतो. 

लहानपणी हे सारं ठीक आहे. मोठेपणी हे सारं तर व्हावंच पण त्याशिवाय आणखीही काही करता आलं तर पाहावं. म्हणजे नेमकं काय? तर थोडं मागं वळून गतवाढदिवस आठवावा. आपला हा कितवा वाढदिवस आहे? आपण आयुष्यात लोकसंग्रह, ज्ञानसंग्रह, धनसंग्रह अशा वेगवेगळ्या खात्यांमध्ये किती शिल्लक टाकली? याचा हिशोब मांडावा. माता-पिता-गुरु-समाज यांचं ऋण फेडण्याचा किती प्रयत्न केला याचा विचार करावा. मनाशी प्रामाणिक राहून आपल्या वाटचालीची दिशा कितपत बरोबर आहे हे पाहावे. शालेय प्रगतिपुस्तकात 'अ' श्रेणी अनेकांना मिळते, पण वरीलप्रमाणे गुणांकन करून जीवनाच्या प्रगतिपुस्तकात 'अ' श्रेणी मिळविण्यासाठी खूप परिश्रम घ्यावे लागतात. जे ही श्रेणी मिळवतात, त्यांचा वाढदिवस घरापुरता मर्यादित न राहता समाजाचा होतो. एवढंच काय तर इतिहासही त्याची नोंद घेतो.

भारतीय संस्कृतीत वाढदिवस साजरा करताना विशिष्ट टप्प्यांना महत्त्व देऊन त्याला नामाभिधान दिलेले आहे. त्यात वाढत्या वयाबरोबर जीवनाचीही गुणात्मक प्रगती अपेक्षित आहे. पंचविसाव्या वाढदिवसाला रौप्यमहोत्सव म्हटले आहे. चांदीपेक्षा सोन्याचे मूल्य अधिक, म्हणूनच पन्नासाव्या वाढदिवसाला सुवर्णमहोत्सव म्हटले आहे. सोन्यापेक्षा हिरा अधिक मौल्यवान, शिवाय तेजस्वी, प्रकाश देणारा. इतरांचे जीवन उजळून टाकण्याची क्षमता असणारा. साठाव्या वाढदिवसाला हीरकमहोत्सव म्हटलं जातं ते यासाठीच. देव - दानवांनी अमृतच लाभ होण्यासाठी समुद्रमंथन केलं. अमृतप्राशनाने अमरत्व प्राप्त होतं . आपल्या पंचाहत्तराव्या वाढदिवशी आयुष्याचा हिशोब मांडण्याची वेळच येत नाही. कारण आपण प्रारंभापासून भारतीय संस्कृतीप्रमाणे वाढदिवस साजरे करत गेलो, तर या वाढदिवशी आपल्याला कीर्तीरूपी अमरत्व लाभून "अमृतप्राशनाचं" समाधान लाभतं. आपला वाढदिवस इतिहासात नोंद केला जातो. शिवाय हे आपणाला करावं लागत नाही, तर समाजच सारं करतो. असा वाढदिवस हा केवळ कौटुंबिक सोहळा न राहता सार्वजनिक आनंदाचा दिवस ठरतो. काहींना यापुढे जाऊन सह्स्रचन्द्रदर्शन सोहळा (ऐंशीवा वाढदिवस) साजरा करण्याचं, शतायुषी होण्याचं भाग्य लाभतं.

भारतीय संस्कृतीत वाढदिवसाकडे पाहायला सांगितलं जातं ते असं. आता आपला वाढदिवस या पार्श्वभूमीवर कसा साजरा करायचा? 'अमृताचा मार्ग' स्वीकारायचा की नाही? हा विचार ज्याच्या त्याच्या मनावर अवलंबून.

Monday, April 30, 2012

महाराष्ट्र दिन

महाराष्ट्राच्या शूरवीरांची साक्ष देती हे सह्यकडे ।
स्फूर्ती घेऊनि त्यांच्यापासुनी राष्ट्र रक्षिण्या होऊ खडे ।। धृ.।।

तलवारीच्या तालावरती शूर नाचले थयाथया 
थयाथयाट तो पाहुनी करतो शत्रू त्यापुढे गयावया ।
आठवुनी त्या पराक्रमाला पाऊल टाकू सदा पुढे 
स्फूर्ती घेऊनि त्यांच्यापासुनी राष्ट्र रक्षिण्या होऊ खडे ।। १ ।।

गोब्राह्मण प्रतिपालक राजा इथेच झाला तो शिवबा 
महाराष्ट्राच्या जरिपटक्याला अटकपार ने राघोबा ।
राक्षसभुवनी माधवरावे निजामास चारिले खडे  
स्फूर्ती घेऊनि त्यांच्यापासुनी राष्ट्र रक्षिण्या होऊ खडे ।। २।।

त्या रक्ताचे वारस आम्ही भाग्य असे हो हे अमुचे 
हुंकाराने केवळ अमुच्या ऊर धडाडे शत्रूचे ।
राष्ट्रघातकी शोधून त्यांना चला देऊया उचित धडे 
स्फूर्ती घेऊनि त्यांच्यापासुनी राष्ट्र रक्षिण्या होऊ खडे ।। ३।।

Monday, April 23, 2012

'अग्नी-५'च्या निमित्ताने

आपले माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांनी "भारत २०२०" हे स्वप्न पाहिलं. आपला देश महासत्ता होईल असा विश्वास आपल्या देशबांधवांना दिला. साऱ्या जगाच्या नजरा भारताकडे लागल्या. हे सारे खरे आहे. पण खरंच हे घडेल का? 

अशी शंका का यावी? आणि तीही 'अग्नी-५' चे यश हाती असताना! आश्चर्य वाटतंय नं? वाटो. मला मात्र वेदना जाणवतात. का? काय महत्त्व 'अग्नी-५'ला दिलं आम्ही?  'अग्नी-५'चं यश पाहून किती लोकांनी आनंदोत्सव साजरा केला? किती फटाके वाजले? ज्या घटनेनं आमच्या शेजारच्याच काय पण जगातल्या अन्य मोठ्या राष्ट्रांचे एका अर्थानं धाबे दणाणले त्या घटनेचं स्वागत आम्ही कसं केलं? या साऱ्या प्रश्नांचं मोहोळ मनात उठतं. 

आज देशातील तरुणच काय तर त्यांचे आजोबाही क्रिकेटज्वरानं ग्रासले आहेत. भारताचा सामना सुरु असेल तर साऱ्यांचे लक्ष त्याकडेच. पाकिस्तानशी सामना असेल तर रस्ते संचारबंदीची आठवण करून देतात. सामना जिंकला तर फटाक्यांचे आवाज तोफांची आठवण करून देतात. अगदी रात्री - अपरात्रीही. आणि हे सारं अगदी स्वेच्छेने. ना आदेश ना फतवा. मतभेद, पंथभेद, पक्षभेद, आर्थिक - सामाजिक - शैक्षणिक अंतर कशाकशाचा भेद नसतो. गल्ली ते दिल्ली फक्त हा आणि हाच विषय. त्याखालोखाल चर्चा असते चित्रपटक्षेत्राची. परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेतील 'उताऱ्याला योग्य शीर्षक' द्यायला ज्यांना जमलं नाही अशी मंडळीही अभिनेत्यांच्या घरातील बारशाची, नाव काय ठेवायचं याची चर्चा करताना दिसतात. या पार्श्वभूमीवर ' अग्नी-५' ची दखल आम्ही कशी घेतली? त्या संशोधकांचं अभिनंदन करण्यासाठी, हा आनंद share करण्यासाठी किती एसएम्एस पाठवले गेले?                   
ज्या घटनेचा आपल्या देशाच्या म्हणजेच पर्यायानं आमच्या व्यक्तिगत सुरक्षेशी संबंध आहे त्या घटनेबद्दल आमची प्रतिक्रिया काय ? 

माझं ना क्रिकेटशी वैर ना चित्रपटाशी. पण शालेय जीवनातल्या १९६५ व १९७१ च्या युद्धांच्या आठवणी आजही मनात ताज्या आहेत. चर्चा, सैनिकांना प्रोत्साहन देण्यासाठी सभा, प्रभात फेऱ्या, प्रार्थना कितीतरी उपक्रम. अगदी शालेय विद्यार्थ्यांचा सहभागही महत्त्वपूर्ण असायचा. त्यानंतर विजयाचा जल्लोष, गणेशोत्सवातील त्यासंबंधीचे देखावे. काय काय सांगावं ? या पार्श्वभूमीवर 'अग्नी-५' च्या स्वागताचा उत्साह जाणवला का? नसेल तर का नाही? आमच्या शास्त्रज्ञान्चा उत्साह मग वाढेल कसा? नवे संशोधक निर्माण व्हावेत कसे? क्रिकेटपटू आणि अभिनेते यांच्यासाठी पायघड्या आणि फटाक्यांची आतषबाजी, उद्योजकांपासून शासनापर्यंत  साऱ्यांकडून बक्षिसांची उधळण; पण मग आपल्या  ज्ञानाचा उपयोग राष्ट्रासाठी करणाऱ्या संशोधकांना समाज काय देतो? खेळाडूंना महत्त्व नाही असं नाही पण काही गोष्टींचा तारतम्याने विचार करायची वेळ आली आहे हे नक्की. राष्ट्राचा विकास व्हायचा असेल तर सर्व क्षेत्रांकडे लक्ष हवं हे जितकं खरं तितकंच त्या क्षेत्रांचा प्राधान्यक्रम योग्य रीतीने लावणे आवश्यक आहे हेही महत्त्वाचं. अर्थात हे झाले माझे विचार, साऱ्यांचे तसेच असले पाहिजेत असं नाही.