Showing posts with label निसर्ग. Show all posts
Showing posts with label निसर्ग. Show all posts

Thursday, October 25, 2012

सीमोल्लंघन

शमी ही  श्री गणेशाची लाडकी वनस्पती. अज्ञातवासात पांडवांची शस्त्रे वर्षभर शमी वृक्षावर विसावली होती. याच शस्त्रांनी पुढे अन्याय - अधर्माचा नाश केला. म्हणून शमीचं महत्त्व आणखीनच वाढलं.
निरपेक्षपणे ज्ञानदान करणारे वरतंतू ऋषी, गुरुदक्षिणेचा  आग्रह धरणारा त्यांचा शिष्य कौत्स, कौत्साच्या ज्ञानाचा गौरव करण्यासाठी कुबेराला आव्हान देणारा रघुराजा, रघूच्या पराक्रमाला मान देऊन सुवर्णमोहरांचा  वर्षाव करणारा कुबेर, आपल्याला हव्या तेवढ्याच मोहरा घेणारा कौत्स, शिल्लक मोहरा लुटून टाकणारा दानशूर रघु, या साऱ्यांचा साक्षीदार म्हणजे आपट्याचा वृक्ष. याच वृक्षावर सुवर्णमोहरांचा पाऊस पडला होता.
भारतीय संस्कृतीतील या महान आदर्शांची आठवण म्हणूनच 'शमी' आणि 'आपटा' यांना सोन्याचा मान मिळाला आहे. याच आदर्शांची जपणूक करण्यासाठी आपणही एकत्र येऊयात. 'ज्ञानी', 'दानी' आणि 'स्वाभिमानी' लोकांची परंपरा निर्माण करूयात!
या कार्यासाठी व्यक्तिगत जीवनाच्या सीमा ओलांडून बाहेर पडणे हेच खरे सीमोल्लंघन!

विजयादशमी अर्थात दसरा पर्वाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!


Friday, April 13, 2012

माऊली अन् मोगरा

 चैत्र - वैशाख म्हटलं की कैरीचं पन्हं, आंब्याची डाळ,  हरबऱ्याची उसळ या साऱ्या गोष्टी आठवतात. तसाच मोगराही आठवतो. मोगरा म्हणजे वसंत ऋतू. वसंत म्हणजे यौवन, अर्थात शृंगार. पण मग विरागी वृत्तीच्या ज्ञानेश्वरांनी "मोगरा फुलला... " असं का म्हटलं ?   त्यांना मोगरा का आवडला?
फुलांचा राजा गुलाब आहे. सौंदर्य, सुवास, मोहकता हे सारं गुलाबात आहे. आपल्या कांचनवर्णाबरोबरच मोहक सुगंध असणारा सोनचाफा,  स्वर्गाचं वैभव म्हणून ओळखला जाणारा पारिजात, साक्षात लक्ष्मीचं आसन झालेलं कमलपुष्प,  सुकल्यानंतरही सुगंध देत राहणारं बकुळीचं फूल, एवढंच काय,  जाई, जुई, चमेली, सायली, शेवंती अहो कितीतरी नावं आहेत. पण माऊलींनी मात्र  "इवलेसे रोप लावियले द्वारी", म्हणून मोगऱ्यालाच का स्वीकारलं, हा मला पडलेला प्रश्न होता. माऊलींचं चरित्र  लहानपणीच वाचल्यामुळे मलाही मोगऱ्याची ओढ होतीच. म्हणून मीही मोगऱ्याचं  इवलंसं रोप  दारी लावलं. त्याचा वेलू गगनावर नाही पण गच्चीवर गेलाय. आणि त्याची फुलं काढता काढता मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. 
यौवन म्हणजे केवळ शृंगार नव्हे, तर काहीतरी विशेष करून दाखवण्याचा काळ. मानवी जीवनातला सर्वाधिक ऊर्जासंपन्न काळ.  ही ऊर्जा अशी वापरावी की ज्यातून स्वत:ला सुख मिळावेच पण इतरांच्या जीवनातही सुखाची शिंपण करता आली तर अधिक चांगलं; आणि तीही अगदी निरपेक्षपणे, सहजपणे.  असा यौवनाचा अर्थ   माऊलींना अपेक्षित असावा. 
मोगरा बहरतो तो ऐन उन्हाळ्यात. आग ओकणाऱ्या सूर्याच्या साक्षीनं तो बहरतो, मावळत्या दिनकराच्या साक्षीनं तो फुलतो. दिवसभराच्या उष्म्यानं त्रासलेल्या माणसाचा थकवा तो आपल्या शीतल सुगंधानं क्षणार्धात घालवतो. अगदी "मा फलेषु कदाचन" या वृत्तीनं. 
माणूस सुखाच्या शोधात असतो, पण ते त्याला लवकर सापडत नाही. अशावेळी मोगऱ्याशी मैत्री केली तर सुख लवकर हाती येतं. संध्याकाळच्या वेळी आपण मोगऱ्याच्या कळ्या वेलीवरून अगदी शोधून शोधून काढतो. पण दुसऱ्या दिवशी सकाळी पहावं, तर वेलीवर काही फुलं दिसतात. अरेच्च्या, ही कशी काय राहिली? असा प्रश्न आपल्या मनात आल्याशिवाय राहात नाही.  मोगऱ्याच्या कळ्या या पानावर दडलेल्या असतात. आपल्या हाताशी असूनही आपल्याला दिसत नाहीत. दुसऱ्या दिवशी फुलं पाहिल्यावर, अरे इथं तर आपण पाहिलं होतं असं आपण मनात म्हणतो. सुखाचंही अगदी तसंच आहे. ते आपल्या आसपास असतं पण आपल्याला दिसत नाही.  मोगरा आपल्याला सांगतो, नीट पहा, माझ्याइतकंच सुखही तुमच्या जवळ आहे.     
माऊलींना इतर फुलांपेक्षा मोगरा भावला, त्याचं हेही एक कारण असेल. माऊलींनी अनंत यातना सोसल्या. पण ज्ञानेश्वरी, अमृतानुभव यासारखे महान ग्रंथ समाजाच्या हाती घेऊन समाधी घेतली, अगदी ऐन तारुण्यात. जीवनाचं सार्थक झाल्याचं समाधान त्यांना लाभलं. आजच्या तरुणाईनं माऊली आणि मोगरा या दोघांचंही जीवन जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर त्यांनाही जीवनातील इतिकर्तव्यतेचा आनंद अगदी सहजपणे मिळवता येईल यात शंकाच नाही.    

Tuesday, March 6, 2012

वसंत

वसंत म्हणजे ऋतुंचा  राजा. साहजिकच त्याचे फलांच्या राजाशीही नाते आहेच. आणि म्हणूनच कोकणात वसंताचे दर्शन अधिक विलोभनीय असते. खरं सांगायचं तर कोकण परिसरात या काळात सारी सृष्टी म्हणजेच एक काव्य असतं ! त्या सौंदर्यसागरातील हा एक थेंब नजरेला गवसलेला....

सौंदर्याचे कुंभ बहुत हे
पदोपदी वाटेत सांडले ।
जणू प्रदर्शन विभवाचे हे
परामात्म्याने इथे मांडले ।।

हर्षभरीत हा वायू सांगे
वसंताची चाहुल लागली ।
मनास जुळवित प्रीती धागे
करवंदीची जाळी फुलली ।।

आम्रतरुंना  आला मोहर
सुगंध त्याचा करितो धुंद ।
पंचमात गाउनिया सुस्वर
जपे कोकिळा अपुला छंद ।।

रोमांचित फणसाची कुवरी
हितगुज करिती माडपोफळी ।
बोंडूची या लज्जत न्यारी
अमृतानुभव देती शहाळी ।।