Thursday, March 22, 2012

गुढीपाडवा

आम्रफुलांचा सुगंध घेऊनि
लहर वायूची आली ।
सहज आळवी सुरेल पंचम
 कोकिळ प्रातःकाली ।।
तापतापतो जरी हा दिनकर
होय जिवाला त्रास ।
परी मोगरागंध देतसे
जगण्याचा विश्वास ।।
समयाचे हे भान ठेवुनी,
जगा तुम्ही धैर्याने ।
निसर्गराजा सांगत असतो
सदैव अपुल्या कृतिने।
ठेवून याची जाण करूया,
स्वागत नववर्षाचे ।
प्रसन्नता मंत्राने करूया,
सोने आयुष्याचे ।।
 
 हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !
  

Saturday, March 17, 2012

गिरीप्रेमी

शिवसदनासी भगवे तोरण लावण्यास चालला ।
आज शुभेच्छा त्यास्तव देतो वंदुनी गणराया ।।
सह्याद्रीचे पुत्र चालले
शिव आशीष घेण्या
कैलासाचा नाथ आतुरला
शिवभक्ता भेटण्या
हिमालयावर सारे हरहर महादेव बोला ।।
रुद्राचा अवतार शिवाजी
स्वराज्य निर्माता
घेऊनि त्यांचे नाव करावे
वंदन हिमशिखरा
प्रसन्नता शिव सदनी होईल पाहून तुम्हाला ।।
अनुभव तुमचे सारे तिथले
उत्सुक आम्ही ऐकण्या
जीवनातल्या  पराक्रमाला
देतील जे प्रेरणा
शिव शंभूचा प्रसाद ऐसे बोल तुम्ही बोला ।।
वारकरी तुम्ही हिमालयाचे
भाग्यवान हो खरे
आशीष तुमच्या संगे असतील
महाराष्ट्राचे सारे
स्वागत करण्या पायघड्या या घालू हृदयाच्या ।।

गिरीप्रेमीच्या  पुणे एव्हरेस्ट २०१२ मोहिमेस हार्दिक शुभेच्छा !!!

Thursday, March 8, 2012

रंगपंचमी यमुनाकाठी

क्षणापूर्वीची शांत यमुना करिते का खळबळ
अनपेक्षित हा कोठून आला मुक्त हास्यकल्लोळ ।।
हास्यवलय ते छेदित आला कानी मंजुळ स्वर
क्षणात पटली ओळख की हा श्याम मुरलीचा सूर ।।
यमुनेकाठी उभ्या गोपिका बावरल्या क्षणभर
शोध घ्यावया मुरलीधराचा भिरभिरते नजर ।।
तोच अचानक धावत आला गोपसख्यांचा मेळा
राधेसह त्या गवळणी झाल्या कृष्णाभवती गोळा ।।
रंगबिरंगी रंगीत चेहरे पाहून ध्यानी आले
रंगपंचमी खेळत सारे यमुनाकाठी आले ।।
जमल्या साऱ्या गोपगोपिका गोकुळ अवघे आले
हिरवे, पिवळे, लाल, गुलाबी रंग विविध उधळले ।।
गुलाल उधळे कुणी अचानक, कुणी उडवे पिचकारी
धुंद जाहले, रंग खेळता सान थोर नरनारी ।।
गीत गातसे राधा देई साथ त्यास मुरली
रासनृत्य ते करता सारी भान हरपुनी गेली।।
भाग्यवान ती यमुना अवघे गोकुळही ठरले
भाग्याचे त्या वर्णन करता शब्दच मम सरले।।

Tuesday, March 6, 2012

वसंत

वसंत म्हणजे ऋतुंचा  राजा. साहजिकच त्याचे फलांच्या राजाशीही नाते आहेच. आणि म्हणूनच कोकणात वसंताचे दर्शन अधिक विलोभनीय असते. खरं सांगायचं तर कोकण परिसरात या काळात सारी सृष्टी म्हणजेच एक काव्य असतं ! त्या सौंदर्यसागरातील हा एक थेंब नजरेला गवसलेला....

सौंदर्याचे कुंभ बहुत हे
पदोपदी वाटेत सांडले ।
जणू प्रदर्शन विभवाचे हे
परामात्म्याने इथे मांडले ।।

हर्षभरीत हा वायू सांगे
वसंताची चाहुल लागली ।
मनास जुळवित प्रीती धागे
करवंदीची जाळी फुलली ।।

आम्रतरुंना  आला मोहर
सुगंध त्याचा करितो धुंद ।
पंचमात गाउनिया सुस्वर
जपे कोकिळा अपुला छंद ।।

रोमांचित फणसाची कुवरी
हितगुज करिती माडपोफळी ।
बोंडूची या लज्जत न्यारी
अमृतानुभव देती शहाळी ।।

Friday, February 24, 2012

परीक्षेसाठी शुभेच्छा !

धवल यशाने तुझ्या लाभू दे मायपित्यांना कीर्ति ।
परीक्षेस या आज शुभेच्छा तुजला देतो आम्ही ।।

गुरुजनांनी आजवरी जे तुजसी  दिधले ज्ञान
परिश्रमाने, स्वाध्यायाने केले तू विकसित ।
त्या अभ्यासा प्रकट कराया, असे हीच संधी
उगा कशाला परीक्षेस मग भ्यावे सांग मनी ।।

पालक, गुरुजन पद वंदोनी आशीष त्यांचे घ्यावे
शांत मनाने, प्रसन्नतेने परीक्षेस हे जावे ।
बुद्धिदेवता मंगलमूर्ती ह्रुदयांतरी ठेवावी
ऋद्धि सिद्धि बघ सहजच येतील यशमाला घेउनी ।।

सर्व विद्यार्थीमित्रांना, परीक्षेसाठी  हार्दिक  शुभेच्छा !  

Saturday, January 14, 2012

संक्रांत संदेश

तीळगुळ घेउनी गोड बोलूया, सांगतसे सण संक्रांती
मनामनाचे बांध बांधुया, प्रेम ठेवू ओठी पोटी || धृ. ||

संक्रमणातुन प्रगती घडे ही, संक्रांती दे नित संदेश
घडता परिवर्तन नित येती, प्रगतीचे नव नव उन्मेष |
फेका औदासिन्य मनाचे, सत्कार्या घेऊ हाती
नव्या युगाच्या वाटेवरती, गति घेऊ प्रगतीसाठी || १ ||

संक्रमणाचे तत्त्व अनादि, निसर्ग आम्हा सांगतसे
अखंड अविरत अवकाशातुन, रथ सूर्याचा चालतसे |
सतत वाहते सरिता निर्मल, खडक दरी लंघुन जाई
विशालता तिची कळते क कधी, बघता तीज उगमाठायी || २ ||

सत्य शिवाची पुण्य कल्पना, मनोमनी संक्रांत करू
समाजमंदिर सुंदर करण्या, एकजुटीने यत्न करू |
समर्पणाचे तत्त्व शिकुया, करू साजरी संक्रांती
बीज नुरे डौलात तरु डुले, ही सृष्टिची परिपाठी || ३ ||

संक्रांतीच्या  हार्दिक  शुभेच्छा !  

Tuesday, January 10, 2012

आयुष्याचे दोन प्रकार

जीवन जगण्यात आनंद आपोआप मिळत नाही, तर तो संघर्षाने मिळवावा लागतो. मी आयुष्याचे दोन प्रकार मानतो. एक म्हणजे सुखासीन आयुष्य, ज्यात सर्व तऱ्हेची भौतिक सुखे अवतीभवती पिंगा घालीत असतात; पूर्वपुण्याई, वारसाहक्काने मिळालेली संपत्ती वगैरे. कारण कोणतेही असो, पण जीवनाच्या गरजा सहजपणे पूर्ण होतात. पण या सुखाचा आनंद लाभेलच असे नाही.
याउलट दुसरा प्रकार आनंदी आयुष्याचा. यात भौतिक सुखेच काय, पण अन्न, वस्त्र, निवारा या अत्यावश्यक गरजांची पूर्तताही होणे अनेकदा कठीण असते. या प्रकारात पदोपदी संघर्षच करावा लागतो. पण या आयुष्यात जगण्याचा निखळ आनंद देणारे असे अनेक क्षण असतात, ज्यांचे वर्णन करणे केवळ अशक्य. भगवंताच्या भेटीचा आनंद याहून वेगळा नसेल.
या दोन आयुष्यांत आणखी एक फरक आहे. पहिल्यात संबंधित व्यक्तीला सुख लाभते, पण भोवतालची मंडळी त्यावेळी सुखी होतीलच असे नाही. याउलट दुसऱ्या आयुष्य प्रकारातील आनंदाचा क्षण इतरही काही जणांना आनंद देणारा ठरतो.
कोणता मार्ग निवडायचा हे ज्याचे त्याने ठरवायचे.